उमेश गायगवळे
देशात आज एक विचित्र वातावरण निर्माण झालं आहे. बेरोजगार युवक प्रश्न विचारतो, तर तो देशद्रोही ठरतो. विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेवर बोट ठेवतो, तर त्याला अराजकवादी म्हटलं जातं. शेतकरी आंदोलन करतो, तर तो खलिस्तानी ठरतो. पत्रकार प्रश्न त्या विचारतो, तर तो “गोदीबाहेरचा” म्हणून संशयित ठरतो. आणि आता सोशल मीडियावर एका उपरोधिक “कॉकरोच जनता पार्टी”ची चर्चा सुरू होताच सरकारच्या यंत्रणांनी धावाधाव सुरू केली आहे. प्रश्न असा आहे, की एवढ्या महासत्तेच्या दाव्या करणाऱ्या सरकारला खरंच एका “झुरळा”ची भीती वाटते आहे का?
की भीती त्या झुरळांच्या मागे उभ्या राहिलेल्या कोट्यवधी संतप्त युवकांची आहे?
“कॉकरोच जनता पार्टी” हा एखादा नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. तो एक उपरोध आहे. व्यवस्थेवर फेकलेला उपहासाचा दगड आहे. पण हा दगड इतका अचूक जागेवर जाऊन बसला, की सत्तेच्या काचेच्या भिंती हादरल्या. कारण हा विनोद नव्हता; तो देशातील बेरोजगार, नैराश्यग्रस्त आणि उपेक्षित तरुणांचा हुंकार होता.
गेल्या काही वर्षांत देशात विकासाचा धडाका सुरू आहे.
एक्सप्रेस-वे, बुलेट ट्रेन, भव्य पुतळे, परदेश दौरे, जी-२०, विश्वगुरू, अमृतकाल… प्रचाराचा इतका पसरवला गेला, की वास्तव दिसेनासं झालं. पण … दुसरं चित्र समोर येतं – बेरोजगार युवकांचं, उद्ध्वस्त मध्यमवर्गाचं, पेपरफुटीने होरपळलेल्या विद्यार्थ्यांचं आणि वाढत्या महागाईने पिचलेल्या सामान्यांचं.
२०१६ ची नोटबंदी हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर टाकलेला सर्वात मोठा राजकीय प्रयोग होता. काळा पैसा संपेल, दहशतवाद मोडेल, भ्रष्टाचार थांबेल, असं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात काय झालं? छोट्या उद्योगांचा कणा मोडला. लाखो कामगार बेरोजगार झाले. बाजारपेठा ओस पडल्या. हातावर पोट असणाऱ्या माणसांची राखरांगोळी झाली. त्यातून देश सावरत नाही तोच कोरोना आला. लॉकडाऊनच्या नावाखाली लाखो मजूर रस्त्यावर फेकले गेले. पायात चप्पल नाही, खिशात पैसा नाही, पोटात अन्न नाही – अशा अवस्थेत माणसं शेकडो किलोमीटर चालत गावाकडे निघाली. तो भारत विसरता येणारा नाही.
पण या सगळ्यातून सरकारनं धडा घेतला का?
उलट, प्रचाराचा आवाज अधिक वाढवण्यात आला.
आज देशातील तरुणांची परिस्थिती भयावह आहे. लाखो पदवीधर युवक नोकरीच्या शोधात भटकत आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे आता विनोद बनलाय. पेपरफुटी, भरती घोटाळे, मुलाखतीतील भ्रष्टाचार, वर्षानुवर्षे रखडलेली पदभरती – या व्यवस्थेने तरुणांच्या आयुष्याशी खेळ मांडला आहे. विद्यार्थी अभ्यास करतो; पण नोकरी पैशाने विकली जाते. गरीब घरचा मुलगा कर्ज काढून शिकतो; पण शेवटी त्याच्या हातात बेरोजगारीच येते.
आणि मग वरून त्यालाच “परजीवी”, “कॉकरोच”, “आळशी” अशा शब्दांनी हिणवलं जातं!
हा अपमान होता. आणि त्या अपमानाचं उत्तर म्हणून “कॉकरोच जनता पार्टी” जन्माला आली.
अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावर केलेला उपरोध एवढ्या झपाट्याने पसरला, कारण त्यामध्ये युवकांच्या मनातलं खरं दुःख होतं. “आम्ही झुरळं असू, पण आम्हाला जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतोय,” हा संदेश तरुणांनी उचलून धरला. काही दिवसांत लाखो युवक या नावाभोवती जमा झाले. इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स जमा झाले. आणि तिथंच सरकारचं धाबं दणाणलं.
कारण सत्ता विरोधकांना हरवू शकते; पण उपरोधाला हरवणं कठीण असतं.
एखाद्या पक्षाला बदनाम करता येतं. एखाद्या नेत्यावर खटले भरता येतात. पण जेव्हा मीम्स, व्यंगचित्रं आणि सोशल मीडिया पोस्टमधून जनतेचा राग व्यक्त होतो, तेव्हा तो थांबवणं कठीण जातं. म्हणूनच “कॉकरोच जनता पार्टी”चं एक्स खाते बंद करण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रक्षोभक मजकूर – नेहमीची कारणं पुढे आली.
मात्र प्रश्न असा आहे, की देश इतका कमकुवत झालाय का, की एका उपरोधिक पेजमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते?
लोकशाहीत सरकारवर टीका करणं हा गुन्हा नसतो. उलट ती लोकशाही जिवंत असल्याची खूण असते. व्यंगचित्रं, उपरोध, विनोद, आंदोलनं – ही लोकशाहीची सुरक्षा झडप असते. पण सध्याच्या सत्तेला टीका सहन करण्याची सवय उरलेली दिसत नाही. सरकारला स्तुती हवी आहे; प्रश्न नकोत. त्यांना टाळ्या हव्यात; आरसे नकोत.
अभिजित दिपकेला मिळालेल्या धमक्या तर आणखी धोकादायक आहेत. “भाजपमध्ये या नाहीतर मारून टाकू”, “अमेरिकेतही संपवू”, “पत्ता शोधून काढू” – ही भाषा कुठल्या लोकशाहीत शोभते? विचारांना उत्तर विचारांनी द्यायचं असतं. पण इथे मतभिन्नता म्हणजे जणू गुन्हा बनवण्यात आली आहे.
आज देशात एक भीषण मानसिकता वाढताना दिसते – “जो आमच्यासोबत नाही, तो देशविरोधी आहे.”
ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे.
देशातील युवकांचा राग हा अचानक निर्माण झालेला नाही. तो वर्षानुवर्षे साचत गेला आहे. नोकऱ्या नाहीत. उद्योग नाहीत. शिक्षण महाग झालंय. शेतकरी संकटात आहे. मध्यमवर्ग कर्जात बुडालाय. महागाईने संसार मोडलेत. आणि या सगळ्यावर सरकारकडून उत्तर म्हणून काय मिळतं? – भाषणं, जाहिराती आणि भावनिक मुद्दे!
पण युवक आता भावनिक घोषणांनी फसत नाहीत. तो डेटा पाहतो. बेरोजगारीचे आकडे पाहतो. स्वतःचं रिकामं पाकीट पाहतो. आणि मग प्रश्न विचारतो.
आज “कॉकरोच जनता पार्टी” हा त्या प्रश्नांचा चेहरा बनला आहे.
या उपरोधिक पक्षाचा जाहीरनामा अनेकांना अतिरंजित वाटू शकतो. पण त्यामागील संताप खरा आहे. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न, निवडणूक प्रक्रियेवरचा अविश्वास, गोदी मीडियावरील रोष, पक्षांतरावरील संताप, महिलांच्या प्रतिनिधित्वाची मागणी, हे मुद्दे हवेतून आलेले नाहीत. ते समाजातील असंतोषातून जन्माला आले आहेत.
विशेष म्हणजे, देशातील पारंपरिक विरोधक निष्प्रभ झाल्यामुळे युवकांना स्वतःचं व्यासपीठ निर्माण करावं लागलं. संसदेत विरोधक कमकुवत आहेत. रस्त्यावरची आंदोलनं थकली आहेत. अशा वेळी सोशल मीडिया हा नव्या पिढीचा राजकीय चौक बनला आहे.
जगभरात युवकांनी सत्तेला आव्हान दिलं आहे. श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष भवनावर युवक चढले. बांगलादेशात विद्यार्थ्यांनी रस्ते पेटवले. नेपाळमध्ये नव्या पिढीने पारंपरिक राजकारणाला धक्का दिला. भारतातही युवकांच्या मनात असाच असंतोष वाढतोय.
आणि सरकारला त्याची भीती वाटू लागली आहे.
कारण सत्ता सर्वात जास्त घाबरते ती संघटित असंतोषाला.
आज परिस्थिती अशी आहे, की सरकारला झुरळं नको आहेत; पण त्याहून अधिक त्यांना युवकांच्या डोक्यातील प्रश्न नको आहेत. म्हणून सोशल मीडिया अकाउंट बंद करा, म्हणून धमक्या द्या, म्हणून विरोधकांना देशद्रोही ठरवा – हा खेळ सुरू आहे.
पण इतिहास सांगतो – प्रश्न दाबले, की ते आणखी तीव्र होतात.
आज देशात सर्वात मोठा धोका “कॉकरोच जनता पार्टी” नाही. सर्वात मोठा धोका आहे युवकांच्या तुटलेल्या विश्वासाचा. कारण एकदा तरुण पिढीला वाटू लागलं, की व्यवस्था तिच्यासाठी नाही, तर मग लोकशाहीची मुळे हादरतात.
सरकारने हे समजून घेतलं पाहिजे, की युवक शत्रू नाहीत. ते देशाचं भविष्य आहेत. त्यांना नोकऱ्या हव्यात, सन्मान हवा, पारदर्शक व्यवस्था हवी. त्यांना प्रचार नको; संधी हवी आहे.
आज युवकांना “हिट” किंवा “मॉर्टेन”ने मारण्याच्या भाषेत बोललं जात असेल, तर ती लोकशाहीची शोकांतिका आहे. झुरळं चिरडणं सोपं असतं; पण युवकांच्या मनातला राग चिरडणं अशक्य असतं.
“कॉकरोच जनता पार्टी” उद्या राहील की नाही, हे महत्त्वाचं नाही. पण तिनं देशाला एक आरसा दाखवला आहे. त्या आरशात बेरोजगार भारत दिसतोय. अस्वस्थ भारत दिसतोय. भ्रमनिरास झालेला युवक दिसतोय.
आणि त्या आरशात सत्तेला स्वतःचा चेहरा पाहण्याची भीती वाटतेय.
कारण जेव्हा सरकार उपरोधाला घाबरू लागतं, तेव्हा समजावं – सत्तेचा आत्मविश्वास डळमळू लागलाय.


