मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील कुस्तीप्रेमींसाठी मे महिन्यातील सर्वात मोठी क्रीडा मेजवानी ठरणारी ३२ वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ येत्या १४ व १५ मे रोजी वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिर येथे रंगणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील अव्वल मल्ल सहभागी होणार असल्याने स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये चुरशीचे सामने रंगणार असून विजेत्या कुस्तीगीरांना आकर्षक रोख पारितोषिके, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मुंबईतील पारंपरिक कुस्ती संस्कृतीला चालना देण्यासोबतच नवोदित मल्लांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महापौर केसरी किताबासाठी लाखोंची बक्षिसे
स्पर्धेतील सर्वाधिक आकर्षण ठरणाऱ्या महापौर केसरी गटात ८२ किलोपेक्षा अधिक वजन गटासाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार, तृतीय क्रमांकासाठी ३२ हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी २२ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे किताबासाठी बलाढ्य मल्लांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
याशिवाय १७ वर्षांखालील कुमार गटातील ५० ते ६० किलो वजनी गटासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या गटातील विजेत्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून उदयास येणाऱ्या युवा कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
कोकण विभागासाठी विशेष गट
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पालघर आणि रायगड या कोकण विभागातील कुस्तीगीरांसाठी स्वतंत्र गट राखीव ठेवण्यात आले आहेत. ५५ ते ६२ किलो, ६२ ते ७२ किलो आणि ७२ ते ८२ किलो अशा विविध वजन गटांमध्ये सामने होणार असून प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभाला मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून त्यानंतर लगेचच कुस्तीच्या लढतींना सुरुवात होईल. १५ मे रोजी सकाळपासून अंतिम फेऱ्यांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पार पडणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला मुंबईच्या महापौर रितु राजेश तावडे आणि उपमहापौर संजय घाडी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धकांसाठी नियमावली जाहीर
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मल्लाने आधारकार्डाची मूळ प्रत आणि चार पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. १७ वर्षांखालील कुमार गटासाठी वयोमर्यादा ३१ मे २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व नियम लागू राहणार आहेत.
स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या मल्लांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यूट्यूबवर होणार थेट प्रक्षेपण
ही संपूर्ण स्पर्धा ‘कुस्ती हेच जीवन’ या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी मुंबई शहर तालीम संघाचे सरचिटणीस प्रकाश तानवडे (९८२१७१७८३५ / ८७८९८५७४५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेचे निवेदन पै. सुरेश जाधव, चिंचोली करणार असून हलगीवादनाची जबाबदारी रणजित साठे, वाटेगाव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पै. संपत पाटील यांनी ही माहिती दिली.


