पुणे प्रतिनिधी
भोर तालुक्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने राज्य हादरलेले असतानाच, पुणे शहरात आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पर्वती परिसरातील दत्तवाडी भागात ९ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस येत मुलीचा जीव वाचला; मात्र घटनेनंतर परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी उशिरा रात्री दत्तवाडी परिसरात ही घटना घडली. घरात एकटी असलेल्या चिमुरडीवर तिच्या ५० वर्षीय आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आणि तिच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पीडित मुलीला तातडीने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. शेकडो नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याबाहेर जमून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नसरापूर येथील प्रकरण ताजे असतानाच शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.


