मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच पवई परिसरात रविवारी संध्याकाळी भरधाव कारने चौघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) या वर्दळीच्या मार्गावर घडलेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून, निष्काळजी वाहनचालकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी मार्केट परिसरातील महात्मा फुले नगरजवळ हा अपघात झाला. नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी विकास दीप सिंधू (वय १९) हा आपल्या कारने वेगाने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. प्रथम त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ही कार थेट रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळली.
धडक इतकी भीषण होती की, पादचारी काही अंतरावर फेकले गेले. अपघातानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि पोलिसांना कळवले.
या अपघातात मनीषा सावंत, नाथा सोपान पारगावकर, अम्माचार पांडे आणि धनुष पांडे हे चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने टागोर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांना घरी सोडण्यात आले, मात्र मनीषा सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पोलिसांत शरणागती, तातडीने जामीन
अपघातानंतर काही काळ फरार असलेला आरोपी विकास सिंधू याने अखेर विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली. जमावाच्या रागामुळे भीती वाटल्याने घटनास्थळावरून पळाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पवई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम २८१ आणि १३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला काही तासांतच जामीन मंजूर करण्यात आला.
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा संशय; रक्तनमुने तपासणीसाठी
दरम्यान, अपघाताच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता का, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
JVLR हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा आणि अपघातप्रवण मार्ग म्हणून ओळखला जातो. अशा मार्गावर वेगमर्यादा धाब्यावर बसवून वाहन चालवले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


