
पुणे:प्रतिनिधी
पहिले लग्न झाले असतानाही विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी करुन डॉक्टर तरुणीला आपण अविवाहित असल्याचे भासवून तिला विवाह करण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपये घेऊन नंतर स्वत:चे खरे रुप दाखविले.
त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या डॉक्टर नराधमाला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे.
डॉ. कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. शंकर कॉलनी, जत़ जि. सांगली) असे या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पोपट फडतरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. कुलदिप सावंत याचे पहिले लग्न झाले असतानाही त्याने जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करुन लग्नासाठी नाव नोंदणी केली. ही नोंदणी पाहून फिर्यादी हे त्यांना स्वत: जाऊन भेटले. त्याचे वागणे व त्याचा दवाखाना पाहून त्यांना तो योग्य वाटला नाही़ म्हणून त्यास नकार कळविला. त्यानंतर त्याने फिर्यादी वडिलांच्या अपरोक्ष त्यांची मुलगी पल्लवी पोपट फडतरे (वय २५) हिच्याशी संपर्क साधून मैत्री केली. तो अविवाहित असल्याचे भासवले. तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून मुलीकडून १० लाख रुपयांहून अधिकची रक्कम घेऊन ती परत केली नाही. त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे व पत्नी गर्भवती असल्याचे पल्लवी हिला समजल्यावर तिला मानसिक धक्का बसला. त्यातून तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
फडतरे यांच्या फिर्यादीची डॉ. राजकुमार शिंदे यांनी कुलदिप सावंत याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन व तांत्रिक तपासावरुन कुलदिप सावंत हा नवी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व अजय कामठे हे दोन दिवस नवी मुंबईत तळ ठोकून होते. त्यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील दिघा येथून ताब्यात घेऊन अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस हवालदार निलेश खोमणे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, संतोष जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली आहे.