मुंबई प्रतिनिधी
‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेची दृश्यमानता (Visibility) वाढविण्यावर भर देत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व प्रशासकीय विभागांना कडक निर्देश दिले आहेत. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक तसेच मोकळ्या जागांवरील कचरा आणि बांधकाम राडारोडा तात्काळ हटवून शहर अधिक स्वच्छ व सुबक ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त भिडे यांनी बुधवारी पहाटे पश्चिम उपनगरांतील विविध भागांना आकस्मिक भेट देत स्वच्छताविषयक कामांची पाहणी केली. एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम आणि के दक्षिण या विभागांतर्गत धर्मशाळा चौकी, खेरवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मरोळ-अंधेरी पूर्व परिसर, तसेच सावित्रीबाई फुले उद्यान येथे सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
पहाटेच्या स्वच्छतेवर भर
वांद्रे (पश्चिम) येथील धर्मशाळा चौकी येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि हजेरीपट तपासत त्यांनी दैनंदिन कामकाजाची सखोल चौकशी केली. “प्रत्येक विभागात सकाळच्या स्वच्छतेवर विशेष भर देणे अत्यावश्यक आहे. रस्त्यांवरील उघड कचरा तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
उप आयुक्त व सहायक आयुक्तांनी दररोज पहाटे प्रत्यक्ष घनकचरा व्यवस्थापन चौक्यांना भेट देऊन कामांची खातरजमा करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा प्रभावी वापर
महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेली अत्याधुनिक स्विपिंग यंत्रे आणि कुशल मनुष्यबळ यांचा अधिक प्रभावी वापर करण्यावर आयुक्तांनी भर दिला. “कचरा उचलल्यानंतर ती जागा तात्काळ स्वच्छ केली जावी. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने वैयक्तिक जबाबदारीने काम केले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, रस्ते आठवड्यातून किमान एकदा धुण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले.
कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
शहरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्यास संबंधित कंत्राटदारांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कामाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य पडून राहणार नाही याची खबरदारी घेण्यावरही त्यांनी भर दिला.
‘क्लीन लीग’मध्ये नागरिकांचा सहभाग वाढवा
‘मुंबई क्लीन लीग’मध्ये रहिवासी व वाणिज्य संकुलांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करत स्वच्छतेच्या निकषांवर सहायक आयुक्तांचे मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करावे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छ मुंबईसाठी सर्वांची जबाबदारी
“मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नाही, तर प्रत्येक मुंबईकराची आहे. जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे,” असे आवाहन करत आयुक्तांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले उद्यानात आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते चाफ्याचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात उप आयुक्त प्रशांत गायकवाड, किरण दिघावकर, विश्वास मोटे तसेच सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


