मुंबई प्रतिनिधी
भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातशी संबंधित असल्याचा दावा करत अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
दमानिया यांनी सादर केलेल्या यादीत राज्यातील काही वरिष्ठ राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांची नावे असल्याचे त्यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आल्याने ‘नाशिक कनेक्शन’ पुन्हा चर्चेत आले आहे.
यादीत कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नर येथील उदय सांगळे, विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे, मंत्री दादा भुसे यांचे पीए रामदास खेडकर, तसेच चंद्रकांत पाटील यांचे पीए मंगेश देशपांडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोतडे यांची नावेही जाहीर करण्यात आली. याशिवाय प्रभाकर काळे, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे, सचिन चुंभळे, मंगेश नवाळे, राहुल देशमुख, अविनाश पोटे, कमलाकर पोटे आणि महेंद्र शेळके-पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला.
दमानिया यांनी सांगितले की, त्यांच्या हाती लागलेल्या कॉल रेकॉर्ड्स आणि भेटींच्या तपशीलांमध्ये रूपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर आणि संकेत सायकर यांची नावे समोर आली आहेत. संबंधित व्यक्तींचे खरातशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा दावा त्यांनी केला असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अशोक खरात याला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, तो मागील महिनाभरापासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर महिला अत्याचाराचे आठ, फसवणुकीचे सहा आणि धमकीचा एक अशा एकूण १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तपासादरम्यान ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवून एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पत्नी फरार; मालमत्तेचा तपास सुरू
अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही शिर्डी येथील जमीन बळकावल्याच्या प्रकरणात अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि विशेष तपास पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. तपासादरम्यान काही राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता उभारल्याचेही प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाणार का, तसेच या प्रकरणाचा तपास आणखी कोणत्या दिशेने पुढे जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


