अकोला प्रतिनिधी
एप्रिलच्या मध्यातच विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र होत असताना अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील जुने भागातील दगडी पुलाजवळील अगरवेस परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) एका टेम्पोमध्ये ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या मृत्यूकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.
बुधवारी अकोल्याचा पारा ४४.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. सकाळी दहाच्या सुमारासच रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून दुपारपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवरही शुकशुकाट दिसून येत आहे.
दुपारी १२ ते ४ या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. फेरीवाले, रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांसारखे उघड्यावर काम करणारे नागरिक सावलीचा आसरा घेताना दिसत असून उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. १९ एप्रिलपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरण कोरडे आणि उष्ण राहणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू आहे. प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारच्या घातपाताची चिन्हे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
याबाबत जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत लेव्हरकर यांनी सांगितले की, “मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व अंगांनी तपास करण्यात येत आहे.”
खबरदारीचा इशारा
दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, अंगात अशक्तपणा, शरीराचे तापमान अचानक वाढणे ही उष्माघाताची लक्षणे मानली जातात. अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, सैल व हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे, तसेच शक्यतो सावलीत राहणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


