चेन्नई:
तामिळनाडूमधील पोलीस कोठडीत झालेल्या अत्याचारामुळे बाप-लेकाचा मृत्यू झालेल्या बहुचर्चित सथानकुलम पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण प्रकरणाचा अखेर सहा वर्षांनंतर निकाल लागला आहे. या प्रकरणात न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत नऊ पोलिसांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. देशात एकाच वेळी इतक्या पोलिसांना मृत्यूदंड ठोठावण्याची ही पहिलीच घटना ठरली असून या निकालामुळे संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस अत्याचाराच्या घटनेने देश हादरला होता
२०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलम येथे ही घटना घडली होती. स्थानिक व्यापार पी जयराजआणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना लॉकडाऊनचे नियम मोडल्याच्या आरोपावरून १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
जयराज यांचे मोबाईल अॅक्सेसरीजचे दुकान ठरलेल्या वेळेनंतरही उघडे ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला. अटकेनंतर दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथे रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाला. या मारहाणीमुळे दोघेही गंभीर जखमी झाले. काही तासांतच त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
ही घटना समोर येताच देशभर संतापाची लाट उसळली होती. मानवाधिकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला होता.
महिला कॉन्स्टेबलची साक्ष ठरली निर्णायक
या प्रकरणाच्या सुनावणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. एका महिला कॉन्स्टेबलने दिलेली साक्ष हा महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच पोलीस स्टेशनमधील टेबल आणि काठ्यांवर आढळलेले रक्ताचे डागही तपासात निर्णायक ठरले.
प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीकडे होता; मात्र मद्रास हायकोर्टाच्या निर्देशानंतर तपास (सीबीआय) कडे सोपवण्यात आला. सीबीआयने एका निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह एकूण दहा पोलिसांविरोधात खटला दाखल केला.
तपासादरम्यान आरोपींनी सीसीटीव्ही फुटेज हटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. आरोपींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा नंतर कोविड-१९ मुळे मृत्यू झाला.
सहा वर्षांच्या सुनावणीनंतर ऐतिहासिक निकाल
या प्रकरणाची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे मदुराई खंडपीठ अंतर्गत मदुराई न्यायालयात चालू होती. आरोपींकडून मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करण्यात आला; मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल आणि तपासातील माहितीच्या आधारे न्यायालयाने हा मृत्यू पोलीस अत्याचारामुळेच झाल्याचे स्पष्ट मान्य केले. अखेरीस सहा वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
शिक्षा सुनावलेले आरोपी
या प्रकरणात निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन व ए. समिदुराई, तसेच कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
न्यायालयाची कडक टिप्पणी
न्यायालयाने निकाल देताना या घटनेला “सत्तेचा उघड दुरुपयोग आणि अत्यंत क्रूर कृत्य” असे संबोधले. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेनेच कायद्याचे उल्लंघन केल्यास समाजावर गंभीर परिणाम होतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
या निकालामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून, पोलीस कोठडीतील अत्याचारांविरोधात हा निकाल ऐतिहासिक ठरेल अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.


