पुणे प्रतिनिधी
गोव्यातून स्वस्त दरात विदेशी मद्य आणून महाराष्ट्रात चढ्या दराने विक्री करणाऱ्या मद्य तस्करीच्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून इंदापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत तब्बल २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय पथकाला गोव्यातील विदेशी मद्य प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने इंदापूर परिसरात सापळा रचला. संशयास्पद मालवाहू वाहनाचा पाठलाग करून ते कांदलगाव परिसरात अडवण्यात आले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २५ प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले मद्य आणि मद्याच्या बाटल्यांचे सुमारे १ हजार ४०० बुच आढळून आले. यानंतर पथकाने वाहनातील दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी प्रेम सोमनाथ भांडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत गोव्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य स्वस्त दरात आणून ते ड्रममधून बाटल्यांमध्ये भरले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर हे मद्य महाराष्ट्रात चढ्या दराने विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी अक्षय देशमुख याच्या सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसरातील घरावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या ठिकाणी गोव्यातील विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे दोन हजार बुच असा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातही कारवाई करून तपासाचा विस्तार करण्यात आला.
गोव्यात विदेशी मद्य स्वस्त दरात उपलब्ध असल्यामुळे तस्करांकडून ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ड्रममध्ये मद्य भरून ते गुप्तपणे वाहतूक केले जात होते. नंतर बाटल्यांमध्ये भरून बाजारात विक्री केली जात होती. या प्रकारामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक अशोक शितोळे, सत्यवान गोगावले, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, प्रदीप झुंजारक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणाबाबत अधीक्षक अतुल कानडे म्हणाले, “गोव्यातील विदेशी बनावटीचे मद्य ड्रममध्ये भरून राज्यात छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बेकायदेशीर व्यवहारामुळे शासनाचा महसूल बुडत होता. मद्य तस्करांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहील.”
उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे गोवा-महाराष्ट्र मद्य तस्करीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.


