नाशिक प्रतिनिधी
स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत असून पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत नोंद झालेल्या तक्रारींपैकी तब्बल 70 टक्के तक्रारी महिलांच्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
खरातच्या विरोधात काही धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना तक्रारी नोंदवण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक फोनद्वारे तक्रारी नोंदवण्यात आल्याचे समजते.
लेखी तक्रारींसाठी महिलांचा संकोच
तक्रारींची संख्या मोठी असली तरी लेखी तक्रार देण्यासाठी महिलांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. अनेक महिलांनी फोनवरून आपली आपबीती सांगितली असली तरी पुढे येऊन औपचारिक तक्रार देण्यास त्या घाबरत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारदार महिलांना सुरक्षिततेची हमी देत त्यांना पुढे येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राजकीय वर्तुळातही धक्का
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकर यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप होत असल्याने त्यांनी सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता जवळपास दहा दिवसांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला अटक झाल्यानंतर बराच काळ त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता.
चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवला असून यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमांवरही भूमिका स्पष्ट करणारी पोस्ट शेअर केली आहे. दुसरीकडे, रूपाली ठोंबरे-पाटील यांनीही चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दोन नवे गुन्हे दाखल
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा अशोक खरात याच्याविरोधात आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये एका विवाहित महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पतीसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादाबाबत सल्ला घेण्यासाठी ती खरातकडे गेली असता त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तसेच नेवासा येथील राजेंद्र भागवत या व्यावसायिकाचीही फसवणूक झाल्याची तक्रार समोर आली आहे. व्यवसायात भरभराट होईल असे सांगून खरातने त्याला विविध अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासाची व्याप्ती वाढणार
खरातविरोधात येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढत असल्याने तपासाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अनेक पीडित महिलांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी या प्रकरणामुळे सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूबाबा अशोक खरात याच्या कथित गैरकृत्यांचा तपास पुढे आणखी कोणते नवे पैलू उघड करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


