नाशिक प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आज त्यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) भेट घेऊन काही छायाचित्रे आणि माहिती सादर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसोबत अशोक खरात दिसत असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
“हा भस्मासूर नेमका कुणी पोसला आणि त्याला आर्थिक रसद कुणाकडून मिळाली, याची नावे आता उघड झाली पाहिजेत,” असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
“बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आधी हे फोटो पाहावेत”
सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या, “काल काही जणांनी ‘ताज’ हॉटेलचे संदर्भ देत बिनबुडाचे आरोप केले. मात्र मी आज पुराव्यासकट बोलत आहे. माझ्याकडे असलेले फोटो हे केवळ योगायोग नाहीत. या छायाचित्रांमध्ये अतुल सावे दिसत आहेत. याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत, असे मी म्हणत नाही; पण या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.”
हेमंत गोडसे आणि सिन्नर औद्योगिक परिसराचा संदर्भ
अंधारे यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांचे काही फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्या म्हणाल्या, “एका छायाचित्रात हेमंत गोडसे भूमिपूजन करताना दिसत आहेत. समोर नारळ ठेवलेला आहे आणि त्यांच्यासोबत या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरातही उभा आहे. हे भूमिपूजन सिन्नर औद्योगिक वसाहतीशी संबंधित असल्याचे दिसते. जर हा केवळ सामाजिक कार्यक्रम होता, तर तिथे औद्योगिक वसाहतीतील संपूर्ण कर्मचारीवर्ग का उपस्थित होता? याचे उत्तर संबंधितांनी दिले पाहिजे.”
“दीपक केसरकरांचीही चौकशी व्हावी”
या प्रकरणात माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव घेत अंधारे यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी एका बॅनरचा फोटो दाखवत प्रश्न उपस्थित केला की, “सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचा बॅनर आहे. तिथे शालेय शिक्षण मंत्र्यांचे काय काम? शिक्षण खात्याचा औद्योगिक वसाहतीशी काय संबंध? या संदर्भात मी एसआयटीला पत्र दिले असून केसरकरांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या नेत्याबाबत मी ठामपणे गॅरंटी देते. मात्र इतर नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मी आणखी संशोधन करणार आहे.”
महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्या केवळ सामाजिक कार्यक्रमासाठी भेटत असल्याचे सांगतात. पण एका फोटोमध्ये कॅबिनेट मंत्री शांत उभे असताना स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या महिलेचा सत्कार होताना दिसतो आणि बाजूला अशोक खरात उभा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ याचे स्पष्टीकरण आता मिळाले पाहिजे,” असे अंधारे म्हणाल्या.
‘मास्टरमाइंड’ उघड करण्याचा इशारा
या सर्व छायाचित्रांची माहिती आणि कागदपत्रे एसआयटीकडे सुपूर्द केल्याचे सांगत अंधारे म्हणाल्या की, “या प्रकरणामागील खरा सूत्रधार कोण आहे हे समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. नाशिकपुरतेच नव्हे तर या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचाही तपास होणे आवश्यक आहे.”
अंधारे यांच्या या आरोपांमुळे आधीच गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. आता एसआयटी या आरोपांची कोणत्या पातळीवर चौकशी करते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.


