मुंबई प्रतिनिधी
डबल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा नामांकित पहिलवान हर्षवर्धन सदगीर याने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पवार यांनी हर्षवर्धनला “कुस्ती सोडायची नाही. गुरु काकासाहेब पवार यांच्या तालमीत जाऊन अधिक जोमाने सराव करायचा,” असा स्पष्ट सल्ला देत त्याचा आत्मविश्वास वाढवला.
अलीकडे काही वैयक्तिक कारणांमुळे आणि परिस्थितीमुळे हर्षवर्धन सदगीरने भावनिक अवस्थेतून कुस्ती खेळणे थांबवण्याची भूमिका व्यक्त केली होती. “कुस्ती खेळणार नाही, नोकरीचीही गरज नाही,” अशी भावना त्याने व्यक्त केली होती. मात्र या वक्तव्यानंतर राज्यभरातील क्रीडा क्षेत्र, कुस्तीप्रेमी आणि विविध स्तरांवरून त्याला मोठा पाठिंबा मिळू लागला. अनेकांनी त्याच्या पाठीवर धीराचा हात ठेवत कुस्ती सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
पवारांकडून १२ लाखांची आर्थिक मदत
या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत शरद पवार यांनी हर्षवर्धन सदगीरला वरिष्ठ स्तरावरील सरावासाठी तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या मदतीमुळे हर्षवर्धनचा कुस्ती न सोडण्याचा निर्धार अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘कुस्ती मल्लविद्या’ या इन्स्टाग्राम पेजवरून याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीला मिळालेला मोठा प्रोत्साहनाचा हात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेला दर्जेदार सराव, पोषक आहार, आधुनिक फिटनेस प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक तयारी यासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे.
तरुण मल्लांसाठी प्रेरणादायी घटना
डबल महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणाऱ्या Harshavardhan Sadgir याच्या जिद्दीला आणि मेहनतीला मिळालेला हा सन्मान राज्यातील तरुण मल्लांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. योग्य मार्गदर्शन, सक्षम पाठबळ आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर महाराष्ट्राची माती पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल, असा विश्वासही कुस्तीप्रेमींनी व्यक्त केला आहे.
कुस्तीच्या पारंपरिक वारशाला आधुनिक प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास महाराष्ट्रातील मल्लविद्येला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या या मदतीमुळे हर्षवर्धन सदगीर आता नव्या जोमाने सरावाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


