मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात घडल्याचा दावा करण्यात येत असून या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुणी रेकॉर्ड केला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्हिडीओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून तो शासकीय निवासस्थानात चित्रित झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, तृतीयपंथी पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्हिडीओबाबत मोठा दावा केला. व्हायरल झालेला व्हिडीओ पवन यादव यानेच आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे त्यांनी सांगितले. पवन यादव याला तृतीयपंथी मंडळावर मोठे पद हवे होते. त्यासाठी त्याने मंत्र्यांशी जवळीक साधून नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये अनेक राजकीय नेत्यांसोबतचे व्हिडीओ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र विरोधकांचा दबाव वाढत असल्याने झिरवाळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


