मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पुन्हा तापले असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना थेट इशारा दिला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा कट रचला गेला, असा आरोप रोहित पवारांनी केल्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या, कोणत्या स्तरावर कोणते प्रयत्न झाले आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणत्या प्रकारचे राजकीय डावपेच रचले गेले, याची सविस्तर माहिती आपल्या जवळ असल्याचा दावा तटकरेंनी केला. “कृपा करून थांबा, अन्यथा मला अनेक गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी रोहित पवारांना दिला.
‘अजित पवारांच्या कुटुंबाविरोधात कट’
पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या पार्थिवाला रुग्णालयात आणण्यात आले, पोस्टमार्टमची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतरही अनेक राजकीय हालचाली सुरू झाल्या. त्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचे प्रयत्न झाले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“अजित पवार जिवंत असतानाही त्यांच्या विरोधात कटकारस्थान होत होते. आज त्याच पद्धतीचे डावपेच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आणि आमच्या पक्षाविरोधात रचले जात आहेत. मात्र जनता आणि पक्षाचे प्रमुख नेते अशा राजकारणाला योग्य वेळी उत्तर देतील,” असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
‘मलाही अनेकदा टार्गेट केले’
तटकरे यांनी सांगितले की, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत होत असताना काहींनी सातत्याने त्यांना लक्ष्य केले.
“२०१४ पासून मला वारंवार टार्गेट केले गेले. तरीही आम्ही सर्वांनी अजित दादांना सावलीसारखी साथ दिली. त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष संघटनेत मजबूत पकड निर्माण झाली होती. त्या प्रक्रियेत आमचाही सहभाग असल्याने काहींना ते खटकणे स्वाभाविक आहे,” असे ते म्हणाले.
NDA मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “तो निर्णय घेताना आम्ही अजित दादांसोबत होतो. पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत आणि विलीनीकरणासंदर्भातही त्यांच्या काही भूमिका होत्या,” असे त्यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या दौऱ्यावर टीका
रोहित पवारांनी राज्यभर काढलेल्या दौऱ्यावरही तटकरे यांनी टीका केली.
“मधल्या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा दौरा काढला. प्रचंड खर्च आणि प्रसिद्धी करून हा दौरा करण्यात आला. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या युवक संघटनेचा एखादा जिल्हाध्यक्ष गेला तरी अनेक कार्यकर्ते एकत्र होतात, इतकी आमची ताकद आहे. इतका गाजावाजा करूनही तो दौरा फ्लॉप ठरला,” अशी टीका त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर काहीजण अस्वस्थ झाल्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला. “अस्वस्थतेतून कावीळ झाल्यासारखी वक्तव्ये करण्याचा प्रयत्न होत आहे,” असेही ते म्हणाले.
राजकीय वातावरण तापले
रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना तटकरेंनी दिलेला इशारा आणि केलेले गंभीर दावे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या वादामुळे राज्याच्या राजकारणातही नवे राजकीय समीकरण आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


