मुंबई प्रतिनिधी
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत, चाकणकर या अनेक महिलांना अशोक खरातकडे घेऊन जात असल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तसेच अशोक खरातशी असलेल्या संबंधांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
‘कुंपणच शेत लांडग्यापुढे टाकत होतं’
आशा मिरगे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत म्हटलं की, “कुंपणच शेत खाते असं आपण ऐकलं होतं; पण इथे तर कुंपणच संपूर्ण शेत लांडग्यापुढे टाकत होतं.” महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना रुपाली चाकणकर या महिलांच्या समस्या ऐकून घेण्यापेक्षा मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये अधिक रमायच्या, असा आरोपही त्यांनी केला.
‘केसरकर आणि चाकणकर हे खरातचे पार्टनर’
मिरगे यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारीही होते. त्यात काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय, “अशोक खरातचे काही राजकीय पार्टनर आहेत. त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे,” असा आरोप त्यांनी केला.
महिलांना खरातच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप
मिरगे यांच्या मते, रुपाली चाकणकर या आपल्या ओळखीतील महिलांना मुद्दाम अशोक खरातकडे घेऊन जात असत. महिला संघटनांच्या बैठकींमध्येही खरातला बोलावलं जायचं. त्या बैठकीत चाकणकर खरातची स्तुती करत असत, असा दावा मिरगे यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर अनेकदा “हा माझा पांडुरंग आहे. मी आज जिथे आहे तिथे पोहोचण्यात यांचा मोठा वाटा आहे,” असे म्हणत खरातची प्रशंसा करत असत. त्यामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या भोळ्या-भाबड्या महिलांवर त्याचा प्रभाव पडत असे आणि त्या त्याच्या संपर्कात येत असत.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
आशा मिरगे यांनी सांगितले की, नीरज जाधव नावाचा व्यक्ती अशोक खरातच्या कार्यालयात काम करत होता. लग्नानंतर त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी खरातने बोलावल्यामुळे जाधवला संशय आला. त्यानंतर त्याने खरातच्या कार्यालयात छुपे कॅमेरे बसवले.
या कॅमेऱ्यांमध्ये कार्यालयात घडणाऱ्या अनेक गोष्टींचे फुटेज कैद झाले. त्यानंतर जाधव हे फुटेज घेऊन गायब झाला. सुमारे तीन महिन्यांनंतर त्याने एका एआरटीओ महिला अधिकाऱ्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केल्याचा आरोप मिरगे यांनी केला.
गुंगीचे औषध देऊन अत्याचाराचा संशय
मिरगे यांच्या मते, त्या महिलेने सांगितले की अशोक खरातने तिला काहीतरी पिण्यास दिले होते. त्यामुळे तिला गुंगी आली आणि त्यानंतर नेमकं काय घडलं याची तिला कल्पना नव्हती. नंतर व्हिडिओ समोर आल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.
या प्रकरणी त्या महिलेने शिर्डी येथे नीरज जाधवविरोधात गुन्हा दाखल केला. ही बाब अशोक खरातपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने नाशिकमध्ये फोटो मॉर्फ केल्याची तक्रार दिली. मात्र तपासात ते फोटो आणि व्हिडिओ खरे असल्याचे समोर आले, असा दावा मिरगे यांनी केला.
मोबाईल तपासात ५८ व्हिडिओ
पोलिसांनी पुढे अहिल्यानगर येथे नीरज जाधवचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये ५८ व्हिडिओ असल्याचे उघड झाले. याशिवाय आणखी काही व्हिडिओ असल्याची माहिती तपासात समोर आल्याचेही मिरगे यांनी सांगितले.
‘महिला आयोगावरचा विश्वास ढासळला’
आशा मिरगे यांनी असा आरोपही केला की, महिला आयोगाबद्दल महिलांमध्ये विश्वास कमी होण्यामागे रुपाली चाकणकर यांची कार्यशैली कारणीभूत ठरली.
त्यांच्या मते, पूर्वीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सामान्य महिलांना आपल्यासारख्या वाटत असत. मात्र चाकणकर यांचा वावर, ग्लॅमर, मेकअप आणि सतत मंत्र्यांसोबतचा संपर्क पाहून अनेक महिलांना त्यांच्याशी संवाद साधताना संकोच वाटत असे.
या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, या प्रकरणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


