मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी जंक्शनजवळ शासकीय वसाहतीकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबरचे झाकण तुटल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी याच खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास एक मोटारसायकलस्वार सर्विस रोडने जात असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबरचे झाकण तुटल्यामुळे तयार झालेला मोठा खड्डा त्याच्या नजरेस उशिरा पडला. अचानक समोर आलेल्या या खड्ड्यामुळे त्याची दुचाकी घसरली. सुदैवाने, या घटनेत दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली नाही; मात्र मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, हा सर्विस रोड अत्यंत वर्दळीचा असून दिवसाभरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध असलेले तुटलेले चेंबर कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते.
नागरिकांनी सांगितले की, संबंधित चेंबरचे झाकण बराच काळापासून खराब अवस्थेत होते. मात्र अद्याप त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर हा मोठा खड्डा तयार झाला आहे. सकाळच्या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने दखल घेऊन हा खड्डा बुजविण्याची व चेंबरवर नवीन झाकण बसविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर स्थानिक प्रशासन, आमदार किंवा नगरसेवक यांच्याकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.


