मुंबई प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. खरातसोबत असलेल्या जुन्या संबंधांबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत, “तो अध्यात्मिक श्रद्धेचा भाग होता. मात्र त्याच्यावर झालेले आरोप अत्यंत घृणास्पद आहेत आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
नाशिकमधील स्वघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्याशी संबंध असल्याचे सांगत विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.
“मी फक्त ट्रस्टची सदस्य होते”
पत्रकार परिषदेत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, शिवनिका संस्थानमध्ये त्या प्रदेशाध्यक्ष असताना ट्रस्टवर सदस्य म्हणून काम केले होते.
“माझ्यासोबत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर या ट्रस्टवर होते. नंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजीच संपला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“श्रद्धेपोटी गुरु मानलं”
खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरु मानल्याचेही त्यांनी मान्य केले.
“समाजात आपण अनेकांना गुरु मानतो. आम्हीही श्रद्धेपोटी खरात दाम्पत्याला गुरु मानलं होतं. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण जशी पाद्यपूजा करतात, तशी मी आणि माझ्या पतीने केली होती. माध्यमांमध्ये दाखवले जाणारे व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचे आहेत,” असे त्यांनी सांगितले.
“त्याच्या कृत्यांची कल्पनाही नव्हती”
खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला.
“पाच-सहा वर्षांपूर्वी ज्यांच्या संपर्कात आपण असतो, त्यांची पुढे जाऊन काय वागणूक असेल हे कुणालाही माहीत नसतं. ही घटना समजल्यावर मला मोठा धक्का बसला. लगेच मी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिली,” असे चाकणकर म्हणाल्या.
निष्पक्ष तपासाची मागणी
या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी आपण आधीच केल्याचे त्यांनी सांगितले.
“मी पोलीस महासंचालकांना भेटून तपासाबाबत पत्र दिले आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वालाही भेटून या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी केली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“कृत्य अत्यंत घाणेरडं”
खरातच्या कृत्यांचा निषेध करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
“जे काही घडलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं आहे. अशा कृत्याचं आम्ही कुठेही समर्थन करू शकत नाही. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“महिला म्हणून आरोप झाले, वाईट वाटतं”
खरातसोबत अनेक लोकांचे फोटो असल्याचे सांगत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
“माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो त्याच्यासोबत आहेत. पण एक महिला म्हणून माझ्यावरच आरोप झाले, याचं वाईट वाटतं,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून खरात प्रकरणाची चौकशी आणि त्यातील संभाव्य राजकीय संबंध याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


