मुंबई प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर चाकणकर यांच्यावर तीव्र टीका होत होती. या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा रंगत असतानाच अखेर त्यांनी पदाचा त्याग केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. या भेटीत त्यांनी सात ओळींचे राजीनामा पत्र सादर केले असून त्यात वैयक्तिक कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
राजीनामा पत्रात काय म्हटलं?
आपल्या पत्रात चाकणकर यांनी नमूद केले आहे की, “मी सौ. रुपाली निलेश चाकणकर, आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा देत आहे.”
तसेच, “आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले, त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य लाभेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे कृपया माझा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारावा,” अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.
व्हिडिओ आणि फोटोमुळे वाढला दबाव
दरम्यान, नाशिकमध्ये एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो अलीकडे समोर आले. यामध्ये चाकणकर या खरात यांच्या पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हिडिओनंतर विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा व्यक्तीशी संबंध ठेवणे योग्य नसल्याचा आरोपही करण्यात आला होता.
‘भोंदूबाबा प्रकरणातील पहिली मोठी विकेट’
राजकीय वर्तुळात चाकणकर यांच्या राजीनाम्याकडे ‘भोंदूबाबा प्रकरणातील पहिली मोठी विकेट’ म्हणून पाहिले जात आहे. पुढील काळात या प्रकरणातील चौकशी अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांकडून अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची चौकशी सुरू असून त्याच्या इतर कथित कारनाम्यांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


