नवी दिल्ली, वृत्तसंस्था
देशातील बहुचर्चित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोग ने रविवारी (१५ मार्च) पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या सर्व राज्यांतील मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडणार असून मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या राज्यांतील निवडणुकीची घोषणा कधी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अनेक पक्षांनी निवडणूक कार्यक्रमाच्या शक्यतेचा अंदाज घेत प्रचारसभा, मेळावे आणि संघटनात्मक बैठकांना सुरुवात केली होती.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनीही राज्यात अनेक सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
कोणत्या राज्यात कधी मतदान?
आसाम
• मतदान – ९ एप्रिल
• निकाल – ४ मे
केरळ
• मतदान – ९ एप्रिल
• निकाल – ४ मे
पांडेचरी
• मतदान – ९ एप्रिल
• निकाल – ४ मे
तामिळनाडू
• मतदान – २३ एप्रिल
• निकाल – ४ मे
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान
वेस्ट बंगाल या मोठ्या राज्यात निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
• पहिला टप्पा : २३ एप्रिल
• दुसरा टप्पा : २९ एप्रिल
• निकाल : ४ मे
बंगालकडे देशाचे लक्ष
या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने जोरदार मोहीम उभारली आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सत्ता टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.
तसेच दक्षिण भारतातील तामिळ नाडू आणि केरला या राज्यांमध्येही स्थानिक राजकीय समीकरणांमुळे निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
या पाचही राज्यांच्या निवडणुकीतून आगामी काळातील राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष आता एप्रिलमधील मतदान आणि ४ मे रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे.


