नागपूर प्रतिनिधी
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. महसूल विभागातील प्रलंबित तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत असून राज्यात सुमारे १७०० पेक्षा अधिक तलाठी पदे भरण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू असून जिल्हानिहाय रिक्त पदांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.
राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘मेगाभरती’ उपक्रमाचा भाग म्हणून ही भरती राबवली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) न घेता खासगी एजन्सीकडून परीक्षा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२३ मधील भरतीला विक्रमी प्रतिसाद
यापूर्वी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरतीला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ४४६६ जागांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. अर्जांची मोठी संख्या लक्षात घेऊन ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली होती.
या परीक्षेदरम्यान एकूण ५७०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. त्यापैकी १४६ प्रश्नांवरील ९०७२ आक्षेप वैध ठरवून परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने संबंधित प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली होती.
महसूल सेवकांसाठी पर्यायी पर्याय
दरम्यान, तलाठी भरतीच्या पार्श्वभूमीवर महसूल सेवकांच्या मागण्यांचाही प्रश्न चर्चेत आला आहे. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करावी, अशी त्यांची मागणी होती. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन पर्यायांवर चर्चा केली.
तथापि, विद्यमान नियमांनुसार वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवणे तसेच अनुभवाच्या आधारे अतिरिक्त गुण देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांचे लक्ष आता या भरतीकडे लागले आहे.


