नवी मुंबई प्रतिनिधी
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या संभाव्य गॅसटंचाईची धास्ती आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे नवी मुंबईतील सानपाडा आणि तुर्भे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या नियमांनुसार गॅस वितरणावर मर्यादा येणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर गर्दी केली असून काही ठिकाणी रिकामे सिलिंडर घेऊन लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या बुकिंगमध्ये बदल केल्याची माहिती समोर आल्यानंतर सानपाडा येथील एजन्सीबाहेर शेकडो नागरिकांनी धाव घेतली. सानपाडा सेक्टर ५, ११ आणि ३० येथील अनेक रहिवाशांनी रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर रांगा लावल्या. नव्या नियमांनुसार दोन सिलिंडरच्या बुकिंगमधील किमान अंतर २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले असून वर्षाला केवळ १५ सिलिंडरची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तुर्भे स्टोअर आणि इंदिरानगर परिसरात आधीपासूनच घरपोच गॅस वितरणात विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यातच संभाव्य टंचाईच्या बातम्यांमुळे नागरिकांनी थेट गॅस एजन्सीची कार्यालये गाठल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“गेल्या काही दिवसांपासून गॅस वेळेवर मिळत नाही. आता नवीन निर्बंध लागू झाल्यास घरखर्चाचे गणित कोलमडेल. गॅस संपल्यानंतर २५ दिवस वाट पाहावी लागेल, या भीतीने आम्ही रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहोत,” असे नागरिक संतोष मौर्य यांनी सांगितले.
दरम्यान, गॅस वितरकांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र वितरणातील विलंब आणि नव्या नियमांबाबत स्पष्ट माहिती नसल्याने नागरिकांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्टता करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी सानपाडा आणि तुर्भे परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
पाइप गॅसधारकांनाही चिंता
नवी मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये पाइप गॅसद्वारे घरगुती स्वयंपाक केला जातो. दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स आणि बेलापूर या परिसरांत गॅस पाइपलाइनद्वारे पुरवठा केला जातो. तसेच पनवेल, खारघर, कामोठे आणि नवीन पनवेल येथेही पाइप गॅस सुविधा उपलब्ध आहे. देशभरात पीएनजी गॅसपुरवठा खंडित झाल्यास या विस्तृत परिसरातील सुमारे तीन लाख नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खानावळ व हॉटेल व्यवसायावर परिणाम
नवी मुंबई हा विद्यार्थी आणि कामगारांचा मोठा केंद्रबिंदू मानला जातो. येथे अनेक लहान हॉटेल्स, मेस आणि खानावळी व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात अलीकडेच ११५ रुपयांची वाढ झाल्याने आणि पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने खानावळचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पुरवठ्यावर निर्बंध आल्यास हॉटेल आणि खानावळ व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


