मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला वाकोला ते वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) उड्डाणपूल एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रुझ–चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) प्रकल्पाच्या विस्तारीकरणाअंतर्गत हा पूल उभारला असून सध्या त्याचे सुमारे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुळात हा पूल मार्चअखेरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने जाहीर केले होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे प्रकल्पाच्या कामाला काहीसा विलंब झाला. त्यामुळे आता हा पूल एप्रिलच्या सुरुवातीला सुरू करण्याचा निर्णय घेतला जात आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
एससीएलआरच्या विस्तारीकरणाच्या कामांतर्गत एमएमआरडीएने एकूण तीन उड्डाणपुलांचे बांधकाम हाती घेतले होते. त्यापैकी दोन पुलांचे काम पूर्ण होऊन ते आधीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पातील शेवटचा आणि महत्त्वाचा दुवा असलेला बीकेसी ते वाकोला (पश्चिम द्रुतगती महामार्ग) उड्डाणपूल अद्याप सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन या परिसरातील वाहतूक सुलभ करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
सुमारे ६४५ कोटी रुपये खर्चाचा आणि दोन मार्गिकांचा हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर बीकेसीतून पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाणे वाहनचालकांसाठी अत्यंत सोपे होणार आहे. सध्या बीकेसीहून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांना कलानगर जंक्शनमार्गे वळसा घालून वाकोला येथे जावे लागते. या प्रक्रियेमुळे वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय होतो.
मात्र उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर बीकेसीहून थेट वाकोला येथे अवघ्या काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या मार्गावर सिग्नलमुक्त प्रवास शक्य होणार असून वाहनचालकांचा सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाकोला ते बीकेसी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे.
दरम्यान, उर्वरित बांधकाम, सुरक्षाव्यवस्था आणि अंतिम तपासण्या पूर्ण झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी असलेल्या बीकेसीकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


