मुंबई प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी धक्कादायक दावा करत नव्या वादाला तोंड फोडले. दुर्घटनेत जखमी झालेल्या पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मिटकरी यांनी एका कथित ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत या प्रकरणात दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.
गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले.ज्यात पायलट ने “अजित… pic.twitter.com/URP2RaXTX6
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 9, 2026
मिटकरी यांनी सांगितले की, पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एका व्हॉट्सअॅप कॉलची रेकॉर्डिंग ऐकवली. या संभाषणात ‘VSR’ कंपनीचे मालक वि. के. सिंग यांनी पिंकीच्या भावाला प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा इशारा दिल्याचा आरोप आहे. कथित ऑडिओमध्ये पायलटच्या संदर्भात “अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया” अशी भाषा वापरण्यात आल्याचा दावा मिटकरी यांनी केला.
या संदर्भात मिटकरी यांनी गंभीर शंका उपस्थित करत, “ही भाषा अंडरवर्ल्ड किंवा गुन्हेगारी जगतातील असल्यासारखी वाटते. त्यामुळे व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी काही संबंध आहेत का, याची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणाकडे केवळ अपघात म्हणून पाहणे योग्य नाही, असेही मिटकरी यांनी नमूद केले. त्यांनी सोशल मीडियावर #JusticeForDada हा हॅशटॅग वापरत “आपल्या दादांचा घात झालाय,” असे भावनिक विधान केले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित व्यक्तींची नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे, अपघातातील पीडित कुटुंबावर प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे आरोपही राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जय पवार लवकरच संबंधित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिटकरी यांच्या या दाव्यानंतर प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळणार का, तसेच कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


