मुंबई प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचा परिणाम आता थेट भारतीय नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर जाणवू लागला आहे. अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम देशातील इंधनदरांवर होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता गॅस सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार ग्राहकांना एक सिलिंडर घेतल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. यापूर्वी दुसऱ्या सिलिंडरसाठी किमान १५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी होता. मात्र आता हा कालावधी वाढवून २१ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा सहा दिवस अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खऱ्या ग्राहकांना प्राधान्य देण्याचा उद्देश
प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, घरगुती गॅसचा पुरवठा अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच खऱ्या घरगुती ग्राहकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून देण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बुकिंग प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच मोबाईल अॅप, कॉल सेंटर किंवा अधिकृत एजन्सीमार्फत सिलिंडर बुक करता येणार आहे.
वर्षाला १५ सिलिंडरची मर्यादा कायम
तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी आधीपासूनच काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला वर्षभरात १२ अनुदानित (सबसिडी) सिलिंडर मिळतात. त्याव्यतिरिक्त ग्राहकांना ३ नॉन-सबसिडी सिलिंडर घेण्याची मुभा आहे. म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षात एका गॅस कनेक्शनवर एकूण १५ सिलिंडर मिळू शकतात. या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
२४ तासांत सिलिंडर वितरणाचा नियम कायम
गॅस बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून तेल कंपन्यांनी एजन्सींना २४ तासांच्या आत सिलिंडर पोहोचवणे बंधनकारक केले आहे. अनेक शहरांमध्ये या नियमामुळे ग्राहकांची मोठी सोय झाली असली तरी काही ठिकाणी बुकिंग किंवा वितरणात विलंब होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत.
ग्राहकांमध्ये नाराजी
दरवाढ आणि प्रतीक्षा कालावधी वाढल्यामुळे अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः घरगुती वापरासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिलांनी बुकिंग करताना अडथळे येत असल्याचीही तक्रार केली आहे.
जागतिक परिस्थितीचा परिणाम देशातील ऊर्जा पुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी पुढील काळात परिस्थिती स्थिर झाल्यास नियमांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


