मुंबई प्रतिनिधी
खार पूर्व उपनगरातील जवाहर नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार अनिता रविशंकर कुशवाह (वय ३५) या न्यू दिपकवाडी, चेतन बिझर शॉपिंगजवळ, सर्विस रोड, खार पूर्व येथे कुटुंबासह राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्या २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलींसह नातेवाईकांकडे गेल्या होत्या. १ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास शेजारीणीने फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर तक्रारदारांनी परिचित व्यक्तीस घर पाहण्यास सांगितले असता, घराच्या दरवाजाची कडी तोडलेली असल्याचे दिसून आले. त्या रात्री घरी परतल्यावर घरातील कपाटातील लॉकर फोडून दागिने व रोकड चोरीस गेल्याचे उघड झाले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (७५,००० रु.), १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट (१६,००० रु.), कानातील सोन्याचे दागिने (१०,००० रु. व ४,००० रु.), नथ (२०,००० रु.), चांदीचे दागिने (२०,००० रु. व २,५०० रु.), एक चांदीचा कंबरपट्टा (२,००० रु.) तसेच १०,००० रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कोंडीराम जगरवाल तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. घरफोड्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर दीर्घकाळ बंद ठेवताना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


