मुंबई प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी रोजी ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी एअरलिफ्टचा पर्याय तपासला जात असून त्यासाठी चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकर अपघातांबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्याचे निर्देश केंद्राच्या अखत्यारीतील तेल कंपन्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपिलीन वायू वाहतूक करणारा टँकर उलटल्याने ३६ तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अतिज्वलनशील वायूमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही धोका निर्माण झाला होता. या घटनेवर आमदार चेतन तुपे आणि अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
धोकादायक पदार्थ वाहतूक करणाऱ्या ‘हॅजमॅट’ वाहनांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी तसेच द्रुतगती मार्गावरील बोगद्यांमध्ये आगीच्या प्रसंगी तत्काळ प्रतिसाद देणारी अग्निशमन सुविधा असावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. रस्त्यांची स्थिती सुरक्षित ठेवणे, खड्ड्यांमुळे अशा वाहनांतील वायू हालचाली होऊ नयेत यासाठी विशेष देखभाल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघाताच्या प्रसंगी पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी त्वरेने पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी तसेच प्रवाशांपर्यंत थेट माहिती पोहोचविण्याची प्रणाली उभारावी, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, द्रुतगती मार्गावरील या घटनेत वाहतूक पोलीस व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने परिस्थिती सक्षमपणे हाताळल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोंडीच्या कालावधीत वसूल झालेला ३६ तासांचा टोल परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. परदेशातील काही देशांमध्ये वायूगळती झालेल्या टँकरांना एअरलिफ्ट करून हटविण्याची पद्धत आहे. तो पर्याय महाराष्ट्रातही वापरता येईल का याची तांत्रिक चाचणी सुरू असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


