बीड प्रतिनिधी
मस्साजोग (ता. परळी) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कराड याने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्याला दिलासा मिळण्याची शक्यता तूर्तास संपुष्टात आली आहे.
या प्रकरणात कराड सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याविरुद्ध खटल्याची सुनावणी सुरू आहे. जामीनासाठी त्याने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ तसेच मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केले होते; मात्र सर्व स्तरांवर त्याचे अर्ज नामंजूर झाले. त्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले. “निस्वार्थी समाजसेवकाचा क्रूरपणे खून करण्यात आला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा,फाशी,व्हावी, ही आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे,” असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
मुंडे हत्या प्रकरणातही अडचणी वाढण्याची शक्यता
संतोष देशमुख हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या कराडवर परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही आरोप आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत असून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यात विजयसिंह उर्फ बाळा बांगर याचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. या जबाबांत कराडच्या मुलाचे नाव वारंवार घेतल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


