पुणे प्रतिनिधी
अमली पदार्थांच्या अवैध तस्करीवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने राज्यभर समन्वित कारवाई करत तब्बल ४३ किलो गांजा जप्त केला असून चार सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, दोन चारचाकी वाहने आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
लोणी काळभोर परिसरात १४ फेब्रुवारी रोजी गांजा विक्रीसाठी साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत राज्यातील विविध भागांत शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान पुरवठा साखळीचा माग काढत पथकाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत विशेष कारवाई केली. डोंगराळ भागात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत दुसरा आरोपी मुंबई–आग्रा महामार्गालगत सांगवी परिसरातून पकडण्यात आला. त्याच्याकडून ९ किलो ४२० ग्रॅम गांजा व अंदाजे पाच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी या प्रकरणातील तस्करीचे जाळे उध्वस्त करण्यासाठी तपास अधिक तीव्र केला असून, राज्यातील इतर भागांतील पुरवठा मार्गांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


