पुणे प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रशिक्षण संस्थेला ‘सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीआरपीएफच्या ८७व्या स्थापना दिनानिमित्त गुवाहाटी येथे आयोजित संचलन कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य व उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) निष्प्रभ करण्याच्या क्षेत्रात भारतीय सुरक्षा दलांना दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. फेब्रुवारी २०१२ मध्ये तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ समूह केंद्रात स्थापन झालेली ही संस्था देशातील आयईडी धोका व्यवस्थापनासाठी अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित झाली आहे.
गत १३ वर्षांत संस्थेने १२ हजार ५५३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यात राज्य पोलिस, सशस्त्र पोलीस, विशेष दल तसेच मित्र राष्ट्रांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रशिक्षणाचा परिणाम सुरक्षा कारवायांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. केवळ २०२५ या वर्षात सीआरपीएफने ७६७ आयईडी आणि ६,५१० किलो स्फोटके जप्त केली असून संभाव्य घातपाताच्या अनेक घटना टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
G20 शिखर परिषद २०२३ दरम्यान नवी दिल्ली येथे राबविलेल्या घातपातप्रतिबंधक उपाययोजनांत आयआयएमच्या तांत्रिक कौशल्याची विशेष दखल घेण्यात आली होती. यापूर्वी FICCIकडून २०१७ व २०१९ मध्ये स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार, तसेच काउंटर-आयईडी इनोव्हेटर पुरस्कार पाच वेळा संस्थेला प्राप्त झाले आहेत.
क्षमता निर्माण आयोगाने २०२६-२८ कालावधीसाठी संस्थेला ‘उत्कृष्ट’ दर्जा प्रदान केला असून २०२५ मध्ये रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य परिषदेत घातपातप्रतिबंधक स्पर्धेत संस्थेने रौप्य व कांस्य पदके मिळविली.
आयईडी धोक्यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण पद्धती सातत्याने अद्ययावत करणाऱ्या या संस्थेला मिळालेला पुरस्कार उत्कृष्टता केंद्राचा दर्जा अधिक दृढ करणारा ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.


