पुणे प्रतिनिधी
विमाननगर येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घडलेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरातील ‘रूट्स स्पा’ या केंद्रात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास छापा टाकण्यात आला. पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच स्पामध्ये एकच गोंधळ उडाला. या धावपळीत एका महिलेने तसेच स्पाच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून खाली उडी मारल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व्यवस्थापक गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी परिसर बंदोबस्तात घेऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून स्पा सेंटरमध्ये नेमका कोणता प्रकार सुरू होता, याचा तपास केला जात आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. स्पा व मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


