बीड प्रतिनिधी
राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली असताना बीड जिल्ह्यातील कुर्ला (ता. बीड) येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क उघड्या मैदानात टाकलेल्या मंडपात बसून पेपर लिहावा लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेचे दर्शन घडल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुर्ला येथील केंद्रावर सकाळी विद्यार्थी पोहोचले असता वर्गखोल्यांऐवजी बाहेर उभारलेल्या मंडपात बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची संख्या केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मंडळाच्या नियमांनुसार बोर्ड परीक्षा ही सीसीटीव्ही देखरेखीखाली अधिकृत परीक्षा कक्षातच घेणे बंधनकारक असताना या केंद्रावर नियमांचे उघड उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, राज्यात तापमान वाढीचा इशारा असताना दुपारच्या सत्रात उघड्या मंडपात बसून परीक्षा देताना विद्यार्थ्यांची मोठी दमछाक झाली. डोक्यावर कडक ऊन आणि परीक्षेचा ताण अशा दुहेरी दडपणाखाली विद्यार्थ्यांना पेपर लिहावा लागल्याची माहिती पालकांनी दिली. “परीक्षा कक्षात बसून परीक्षा देणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे; मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले,” अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली.
मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या नियमानुसार परीक्षा केंद्रावर पुरेशी जागा, प्रकाश, वायुवीजन आणि देखरेखीची व्यवस्था आवश्यक आहे. मात्र कुर्ला केंद्रावर या निकषांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. खुल्या जागेत परीक्षा घेतल्याने गैरप्रकारांना वाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
घटनेचे छायाचित्रे व व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. बीड जिल्ह्यात यंदा १५६ केंद्रांवर सुमारे ४३ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व केंद्रांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या असतानाच कुर्ला केंद्रावरील प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आणि पुढील पेपरसाठी विद्यार्थ्यांना नियमित वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार का, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


