बीड प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान बीड येथे बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर काही वेळातच २६ वर्षीय उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान आरोग्य तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वाव्हळे (वय २६) असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी होता. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. बुधवारी दुपारी सुमारे १२.५५ वाजता त्याने १६०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आणि त्यात प्रथम क्रमांक मिळविला. मात्र धाव पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तो मैदानावर कोसळला. तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली; परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दीपक पुण्यात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो गावी राहून भरतीसाठी सराव करत होता. त्याचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर म्हणून कार्यरत असून आई शेतमजुरी करते. कुटुंबातील तो मोठा मुलगा होता. पोलीस भरतीचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दीर्घ पल्ल्याच्या धावण्यासारख्या कष्टप्रद चाचण्यांपूर्वी उमेदवारांनी मूलभूत आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. धावताना हृदयाचे ठोके १४० ते १८० दरम्यान जाणे सामान्य मानले जात असले तरी, पुरेशा तयारीअभावी किंवा अंतर्निहित हृदयविकार असल्यास तीव्र ताण येऊ शकतो. नियमित सराव, वैद्यकीय तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकाची सज्जता या बाबींचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
या घटनेमुळे भरतीसाठी उपस्थित इतर उमेदवारांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने पुढील चाचण्यांदरम्यान वैद्यकीय सुविधांची अधिक काटेकोर व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित होत आहे.


