
ठाणे:प्रतिनिधी
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी चौकशीला वेग आला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे.
मुंबई पोलीस आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिस अनेक खुलासे करू शकतात. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी सुमारे १०० अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती.
खरं तर, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. तसेच छत्तीसगडच्या ट्रेनमधून आणि मध्यप्रदेशातून देखील पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. संबंधितांची चौकशी केली असता ते मारेकरी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ त्यांचा चेहरा हुबेहुब असल्याने पोलिसांनी त्यांना विविध भागातून ताब्यात घेतलं होतं. यानंतर शनिवारी अखेर पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यातील एका रेस्टॉरंट परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
विजय दास उर्फ मोहम्मद इलियास उर्फ बिजोय दास असं अटक केलेल्या आरोपीची तीन वेगवेगळी नावं आहेत. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. डीसीपी, जॉइंट सीपी आणि सीपी यांच्यासह इतर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोराच्या अटकेची पुष्टी केली आहे. आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन पोलीस या घटनेची अधिकची माहिती देणार आहे.
हल्लेखोराला अटक कशी झाली?
खरं तर, सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर २५ हून अधिक पोलीस पथकं देशभरात हल्लेखोराचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी विजय दास हा ठाण्याच्या कासारवडवली परिसरात फिरत असल्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं होतं. या गुप्त माहितीच्या आधारे १०० पोलीसांची टीम तयार करण्यात आली. या टीमने मध्यरात्री दोन वाजता कासारवडवली येथील दाट झाडीतील लेबर कॅम्प मधून अटक केलीये. डीसीपी झोन-6 नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली.
आरोपीला जिथून बेड्या ठोकल्या तो लेबर कॅम्प हिरानंदानी इस्टेट, ठाणे (प.) येथील टीसीएस कॉल सेंटरच्या पाठीमागे असलेल्या मेट्रो बांधकाम साइटजवळ आहे. आरोपी विजय दास हॉटेलमध्ये ठाण्यातील हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करायचा. याबाबतची माहिती मिळताच काही जणांनी त्याला पकडून ठेवलं होतं. मुंबई क्राईम ब्राचला याबाबत माहिती मिळताच टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपीला ताब्यात घेवून त्याची ओळख पटवून पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. अटकेनंतर आरोपीची चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, त्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.