नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी, तर दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून ही निवड अधिकृतरीत्या जाहीर केली.
सभेच्या प्रारंभी महापालिका सचिव संघरत्ना खिल्लारे यांनी पिठासन अधिकाऱ्यांचे स्वागत केले. महापौरपदासाठी दाखल अर्जांपैकी नगरसेविका सरोज रोहिदास पाटील, तसेच उपमहापौरपदासाठी नगरसेवक आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाली.
निवडीनंतर महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले.
महापौर सुजाता पाटील यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि वाहतूक नियोजन या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. महिलांची सुरक्षा, तरुणांना संधी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील, असे त्यांनी सांगितले. महापौरपद ही मोठी जबाबदारी मानून सर्व सदस्यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध आणि संवेदनशील पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गृहिणीपासून नगरसेविका आणि आता महापौरपदापर्यंतचा प्रवास महिलांच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपमहापौर दशरथ भगत यांनी नवी मुंबईच्या नियोजित आणि वेगवान विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. नागरिकांच्या अपेक्षांनुसार विकासकामे सर्वांना सोबत घेऊन केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, डॉ. राहुल गेठे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले.


