मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान संभाव्य अपघात टळल्याची घटना गुरुवारी घडली. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्याने उड्डाण तत्काळ रद्द करण्यात आले.
पायलटच्या नियमित तपासणीदरम्यान हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटी निदर्शनास आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही धोका न पत्करता उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगण्यात येते.
सध्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा मराठवाड्यात झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. लातूरमध्ये त्यांच्या अनेक प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या तांत्रिक अडथळ्यामुळे काही सभांच्या वेळा पुढे ढकलाव्या लागल्या.
दरम्यान, लातूरमध्ये आधीच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समजताच काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तथापि, पंकजा मुंडे या पूर्णतः सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.
वेळेचे नियोजन बिघडू नये यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे पंकजा मुंडे लातूरकडे रवाना होणार असून, नियोजित सर्व प्रचार सभांना उपस्थित राहण्याचा त्यांचा निर्धार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू असलेल्या या प्रचार दौऱ्यात तांत्रिक अडथळा येऊनही मुंडे आपला दौरा पूर्ण करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.


