मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत महायुतीने निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपला ८९, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून ठाकरे बंधूंच्या आघाडीला ७१ आणि काँग्रेसला २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतर व अपक्षांची संख्या १२ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये बंदद्वार संवाद साधला.
शिवसेनेच्या २९ नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुष्पगुच्छ देत सन्मान केल्यानंतर त्यांनी नगरसेवकांना आगामी काळातील कामकाजाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. “आता कामाला लागा. प्रत्येक प्रभागाचा सविस्तर आराखडा तयार करा. जनतेला विकास हवा आहे आणि तो प्रत्यक्ष दिसला पाहिजे,” असे ते म्हणाले.
प्रभागात ठोस बदल दिसणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करताना शिंदे यांनी गुणवत्तापूर्ण कामांवर भर दिला. “शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य घडू नये. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा या विषयांना सर्वोच्च प्राधान्य द्या. आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच निकष ठेवा,” अशी सूचना त्यांनी केली.
निवडणूक निकालांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला. भाजप आपला मित्र पक्ष आहे. जनतेने उबाठाला नाकारले आहे. मिळालेल्या संधीचे सोने करा. कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये, खऱ्या अर्थाने नगरसेवक म्हणून काम करा.”
नगरसेवकांचा थेट जनसंपर्क वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. “कोणत्याही कामाला ‘नाही’ म्हणू नका. सकाळी लवकर उठून वॉर्डात फिरा. पाणी, कचरा आणि स्वच्छता या विषयांवर काटेकोर लक्ष ठेवा. डीप क्लीन ड्राइव्ह राबवा. बाजारपेठा, मंडई, व्यायामशाळा, क्रीडा संकुल यांसारख्या मोठ्या कामांचे प्रस्ताव तयार करा. आरोग्य सेवा सुधारलीच पाहिजे. नगरसेवक लोकांमध्ये दिसला पाहिजे; त्यांच्या समस्या ऐकून विकासात त्यांना सहभागी करून घ्या,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे महापालिकेतील सत्ताकारणाबरोबरच आगामी प्रशासनाची दिशा स्पष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


