मुंबई प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी (आज) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवांमध्ये बदल करण्यात आला असून काही स्थानकांवरील लोकल थांबे तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत.
मेगाब्लॉक कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल थांबणार नसल्याने या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागणार आहे. जलद मार्गासाठी फलाट उपलब्ध नसल्यामुळे या स्थानकांवर लोकल सेवा देणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मेगाब्लॉकदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या लोकल पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या कालावधीत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
दरम्यान, हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल व बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत रद्द राहतील. तसेच पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत रद्द करण्यात येणार आहेत.
ट्रान्स-हार्बर मार्गावरही मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या कालावधीत रद्द राहतील. तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत रद्द करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी आणि नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध राहणार आहे. बेलापूर, नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरही लोकल सेवा सुरू राहील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तरी सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवेसाठी ही कामे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


