मुंबई प्रतिनिधी
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँकेचे संदेश येऊ लागल्याने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
आचारसंहितेतील अडथळा दूर
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या योजनेचा हप्ता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचा नियमित लाभ सुरू ठेवता येतो, या नियमानुसार मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
३००० नव्हे, तर १५००च का?
संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये मिळणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, निवडणूक आयोगाने पुढील महिन्याचा हप्ता आगाऊ देण्यास मज्जाव केला आहे. आचारसंहितेच्या काळात केवळ नियमित हप्ता देता येतो, त्यामुळे सध्या केवळ डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा लाभच देण्यात येत आहे.
विरोधकांचे आक्षेप, आयोगाचा मध्यममार्ग
मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत पैसे जमा करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेत आयोगाने वस्तुस्थिती तपासली. अखेर, योजना आधीपासून सुरू असल्याने नियमित लाभ रोखता येणार नाही, असा मध्यममार्ग आयोगाने स्वीकारला. त्यामुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
खात्यात पैसे आले का? असे तपासा
मोबाईल संदेश: बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईलवर आलेले एसएमएस तपासा.
पासबुक: जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या.
UPI अॅप्स: गुगल पे, फोन पे किंवा इतर UPI अॅप्सवरून बँक शिल्लक तपासा.
संक्रांतीच्या निमित्ताने मिळालेल्या या ‘गोड’ आर्थिक मदतीमुळे राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले आहे.


