मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी राज्य शासनाने संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सलग चार दिवस मद्यविक्री आणि मद्यपानावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान, तर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानुसार, प्रचार समाप्तीपासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध लागू राहणार आहेत.
प्रचाराच्या तोफा मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावणार असून, याच वेळेपासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बार, परमिट रूम तसेच क्लब बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर १४ जानेवारीचा संपूर्ण दिवस, १५ जानेवारीचा मतदानाचा दिवस आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणीचा दिवस निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे.
या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदारांवर कोणताही दबाव येऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ड्राय डेचे वेळापत्रक
मंगळवार, १३ जानेवारी २०२६ – सायंकाळी ६ वाजल्यापासून
बुधवार, १४ जानेवारी २०२६ – संपूर्ण दिवस
गुरुवार, १५ जानेवारी २०२६ – मतदानाचा दिवस (संपूर्ण दिवस)
शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ – मतमोजणीचा दिवस (निकाल जाहीर होईपर्यंत)
या निर्णयामुळे निवडणूक कालावधीत संबंधित भागांमध्ये सलग चार दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद राहणार असून, प्रशासनाकडून अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.


