सातारा प्रतिनिधी
इतिहास, संस्कृती आणि साहित्याचा त्रिवेणी संगम ठरलेल्या सातारा नगरीत गुरुवारी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंगल प्रारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाने या साहित्यकुंभाची औपचारिक सुरुवात झाली. साताऱ्याच्या वैभवशाली परंपरेला साजेसा असा हा सोहळा साहित्यिक, रसिक आणि विचारवंतांच्या उपस्थितीने उजळून निघाला.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशन यांच्या आयोजनाखाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने १ ते ४ जानेवारीदरम्यान हे संमेलन होत आहे. साहित्य, समाज आणि समकालीन विचारांच्या मुक्त संवादाचे हे व्यासपीठ ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ध्वजारोहण व मान्यवरांची उपस्थिती
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण झाले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते. ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांनी उपस्थिती लावली.

ग्रंथप्रदर्शन व ‘कट्ट्यां’चा उत्साह
संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन कट्टा अशा विविध साहित्यिक कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी झाले. या कट्ट्यांमुळे विचारांची देवाणघेवाण आणि सर्जनशील संवादाला चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सातारकरांचा पाहुणचार, साहित्यिकांचा उत्साह
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासनासह सर्वजण प्रयत्नशील आहेत. हे संमेलन साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल.”
संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनीही सातारकरांमधील उत्साह अधोरेखित करत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यरसिकांच्या सहभागामुळे संमेलन अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ग्रंथदिंडीने जागवली परंपरा
संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने संतवाङ्मय, मराठी साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेच्या आठवणी जागवल्या. राजवाड्यापासून सुरू झालेली ही ग्रंथदिंडी राजपथ, पोवई नाका, पोलीस कवायत मैदान मार्गे साहित्यनगरीत दाखल झाली. या दिंडीत ५५ शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पर्यटन, संत साहित्य, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर-मुक्ताबाई यांची परंपरा अशा विषयांवर सादरीकरण केले.
ग्रंथदिंडीला स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी खांदा देत सहभाग नोंदवला, तर प्रमुख मान्यवरांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.
चार दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनातून चर्चा, संवाद आणि सृजनशीलतेचा उत्सव अनुभवण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.


