मुंबई प्रतिनिधी
२०२६ या नववर्षाची सुरुवात राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक ठरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा हप्ता अखेर जमा होण्यास सुरुवात झाली असून, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पैसे खात्यात आल्याने अनेक महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
राज्यातील सुमारे दोन कोटी महिला गेल्या दीड वर्षांपासून या योजनेचा लाभ घेत आहेत. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये थेट जमा करण्याची योजना राज्य सरकारने राबवली आहे. मात्र ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते जमा न झाल्याने लाभार्थींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ४५०० रुपये एकत्र मिळणार, अशा चर्चाही सुरू होत्या; मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती.
अखेर ३१ डिसेंबरपासून एका महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यातच हा हप्ता जमा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा फक्त एका महिन्याचा निधी असून, डिसेंबर तसेच सध्या सुरू झालेल्या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत अद्याप सरकारकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित रकमेबाबत संभ्रम कायम आहे.
दरम्यान, या योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही अट लागू केली होती. ई-केवायसीची अंतिम मुदत यापूर्वी १८ नोव्हेंबरपर्यंत होती; मात्र मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ती वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. वर्षाअखेरीस ही मुदत संपुष्टात आली असून, ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच पुढे दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लाभार्थी महिलांनी आपल्या बँकेच्या अधिकृत अॅप किंवा खात्याच्या तपशीलातून रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या या दिलास्यानंतर आता उर्वरित हप्त्यांबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


