सातारा प्रतिनिधी
शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाईने पुढाकार घेतल्याचे सकारात्मक चित्र सध्या साताऱ्यात दिसून येत आहे. फ्रंट वॉरियर्स हरित सातारा या समूहाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून अजिंक्यतारा पायथा आणि मंगळाई देवी परिसरात सातत्याने वृक्षारोपण व त्या वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. या उपक्रमाला सातारकर नागरिक आणि तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत असून, शहरासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब ठरत आहे.

केवळ वृक्षारोपण न करता, लावलेल्या रोपांचे दीर्घकालीन संवर्धन व्हावे या उद्देशाने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने वेद अकॅडमीचे सागर लोहार सर आणि त्यांच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी जवळपास दोन ते अडीच तास श्रमदान करत वृक्ष संवर्धनाच्या कामात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांनी तण काढणे, माती भुसभुशीत करणे, संरक्षक उपाययोजना करणे आदी कामे उत्साहाने पार पाडली.

फ्रंट वॉरियर्स हरित सातारा यांच्या चार वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अजिंक्यतारा पायथा आणि मंगळाई परिसरात हिरवळ वाढू लागली असून, परिसर हळूहळू हिरवा-गार होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही चळवळ शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असून, सातारकरांसाठी ती अभिमानाची बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, वृक्षारोपणानंतरची खरी गरज म्हणजे लावलेल्या झाडांचे नियमित पाणी देणे आणि निगा राखणे, असे आवाहन फ्रंट वॉरियर्स हरित सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक मोहिमेत सातारकर नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून दररोज सकाळी व सायंकाळी किमान दोन तास सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कन्हैयालाल राजपुरोहित, भालचंद्र गोताड, विनायक शिवगण, रामदास वडीये, गोविंद बेलकर, कुमार रेदांत बने, दिलीप भोजने, गोखले मॅडम, संदीप वाघ आणि राजेश पुराणिक यांनी कृतिशील व मोलाचे योगदान दिले आहे. नागरिकांचा वाढता सहभाग आणि तरुणाईचा उत्साह पाहता, येत्या काळात साताऱ्याचे पर्यावरण अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


