सातारा प्रतिनिधी
सातारा येथे होऊ घातलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे यासाठी संयोजन समितीने विविध अभिनव उपक्रमांना चालना दिली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वेगळेपणा जपणारा उपक्रम म्हणजे ‘साहित्य प्रेरणा ज्योती’.
सातारा जिल्ह्याला मिळालेली समृद्ध साहित्य परंपरा, तेथील साहित्यिकांचे कार्य आणि त्यांची वैचारिक परंपरा जिवंत ठेवण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या स्मृतिस्थळांपासून संमेलनस्थळापर्यंत प्रेरणाज्योतींचे प्रस्थान होणार असून, हा उपक्रम संमेलनाच्या इतिहासात आगळावेगळा ठरणार आहे.
संयोजन समितीकडून नियोजनबद्ध तयारी
संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या समन्वयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने जिल्ह्यातील विविध नामवंत साहित्यिक, समाजसुधारक आणि विचारवंतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रेरणाज्योती प्रज्वलित करण्यात येतील.
प्रेरणाज्योतींची जिल्हाभरातून सुरुवात
प्रेरणाज्योती खालील ठिकाणांहून संमेलनस्थळासाठी रवाना होणार आहेत
सातारा नगरवाचनालय, थोरले प्रतापसिंह महाराज
प्रतापसिंह हायस्कूल , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अजिंक्यतारा साखर कारखाना, शेंद्रे, अभयसिंहराजे भोसले
• मर्ढे कविवर्य बा. सी. मर्ढेकर
• वाई, लक्ष्मणशास्त्री जोशी
• नायगाव, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
• फलटण, बेबीताई कांबळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले
• कटगुण, महात्मा ज्योतिराव फुले
• एनकूळ, उत्तम बंडू तुपे
• रहिमतपूर, ना. ह. आपटे, वसंत कानेटकर, कवी यशवंत
• कराड, यशवंतराव चव्हाण, गोपाळ गणेश आगरकर, संत सखुबाई, इंदिरा संत
• पाटण, कवी विहंग, शाहीर भाऊ फक्कड
मार्गातील प्रमुख ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे.
शिवतीर्थावर एकत्र आगमन
सर्व प्रेरणाज्योती १ जानेवारी रोजी शिवतीर्थ मैदानावर एकत्र येतील. त्यानंतर मिरवणुकीच्या स्वरूपात त्या छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील संमेलनाच्या मुख्य मंडपात विराजमान होतील.
दुपारी ३ वाजता संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रेरणाज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी
तर स्वागताध्यक्ष म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाविषयी जिल्ह्यात विविध स्तरावर जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात असून, संयोजन समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्नशील असल्याची माहिती रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.


