सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात बिबट्या आणि मानव यांच्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी ग्रामीण भागासाठी २५ पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. वनविभागाच्या पथकांमार्फत या पिंजऱ्यांचा वापर संवेदनशील भागात करण्यात येणार असून, बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
आले मत्त्यापूर परिसरातील बिबट शिकार प्रकरणाबाबत संबंधित शिकाऱ्यांचा शोध सुरू असून, “अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही ठरवली जाईल,” अशी माहिती नाईक यांनी दिली.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती ओळखण्यासाठी आणि संभाव्य हल्ले टाळण्यासाठी बिबट्यांच्या आगमनाची पूर्वसूचना देणारी एआय-आधारित अलार्म प्रणाली बसविण्यात येणार आहे.
पाटण, सातारा व जावली तालुक्यांमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्यालगतच्या दुर्गम गावांना याचा लाभ होणार आहे.
वनसीमेच्या लगतच्या शेती पट्ट्यात मोठ्या चरांची (सुरक्षा खंदक) उभारणी करण्याचेही नियोजन असून, या मोहिमेद्वारे मानवी वसाहतींकडे जाणारा बिबट्यांचा वावर रोखण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे.
“ठाकरे बंधू खोट्या अफवा पसरवत आहेत” — पालकमंत्री देसाईंचा आरोप
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू “लोकसभा निवडणुकीप्रमाणे अफवा पसरवत आहेत,” असा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात केला.
“महाराष्ट्राचे कुठेही तुकडे होणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणेच राज्यकारभार चालतो,” असे देसाई म्हणाले.
मुंबईतील मराठी मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करताना, शिंदे गटाला जिल्ह्यात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले. कराड नगरपालिका तसेच जिल्ह्यातील २५ नगरसेवक निवडून आल्याबद्दल त्यांनी शिवसैनिकांचे अभिनंदन केले.
“ज्या ठिकाणी संघटनात्मक ताकद कमी पडली, त्या ठिकाणी लवकरच बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल,” असेही देसाई यांनी स्पष्ट केले.


