बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बुलढाण्यात एक बोगस मतदार मतदान केंद्रात दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. संशय आल्याने स्थानिकांनी त्याला पकडत बेदम मारहाण केली. मात्र पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या आधीच संबंधित मतदार पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणाने राजकीय हलकल्लोळ माजला असून आमदार रोहित पवार यांनी बुलढाण्याचे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्यावर थेट आरोपाची तोफ डागली आहे.
आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते… pic.twitter.com/EV0b8q8KRB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 2, 2025
पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गायकवाड यांच्या मुलाने आणि पुतण्याने पोलिसांशी वाद घालत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांवर कठोर कारवाईची मागणी केली, पण दखल घेतली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच बोगस मतदारांना सोपस्कार करून देत आहेत,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “बुलढाण्यात स्थानिकांनी बोगस मतदार पकडला होता. पण आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालत त्याला पळवून लावले. दिवसाढवळ्या निवडणुकीत असा घोळ सुरू असताना आयोग मात्र निवांत आहे का? सत्ताधाऱ्यांविरोधात कारवाई करायचीच नाही, अशी भूमिका आयोगाने घेतली आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदानाचा आढावा : बुलढाण्यात पहिल्या दोन तासांत ८.०९ टक्के मतदान
बुलढाणा जिल्ह्यात सकाळच्या सत्रात मतदानाची गती संथ राहिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ८.०९% मतदान नोंदले गेले.
सर्वाधिक मतदान करणाऱ्या पालिका :
सिंदखेड राजा — १०.६२%
मेहकर — १०.१८%
मलकापूर — १०.१२%
लोणार — ९.६७%
कमी मतदान झालेल्या ठिकाणांमध्ये :
बुलढाणा — ५.०८%
चिखली — ५.८१%
खामगाव — ८%
नांदुरा — ८.८५%
शेगाव — ८.६७%
पहिल्या टप्प्यात एकूण ३६,१८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २१,००९, तर महिला मतदार १५,१७८ इतकी होती. सकाळी मतदान संथ असले तरी दुपारनंतर गती वाढण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


