बाळापूर प्रतिनिधी
कारंजा (रमजानपूर) फाट्यावर सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी घडलेल्या चाकूहल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. शाळकरी मुलांमध्ये सुरू असलेला किरकोळ वाद निवळवण्यासाठी गेलेल्या गौरव गणेश बायस्कार (रा. नया अंदुरा) याचा भररस्त्यात निर्घृण खून झाला. अवघ्या अर्ध्या तासात मुख्य आरोपीला पोलिसांनी गजाआड करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सकाळी अकराच्या सुमारास लोहारा व नया अंदुरा येथील विद्यार्थ्यांमध्ये कारंजा रमजानपूर फाट्यावर वाद सुरू होता. शेतातील काम आटोपून घरी येत असलेल्या गौरव बायस्कार व त्याचा मित्र मंगेश नागोलकर यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मृताचा चुलतभाऊ राम नागोलकर, कृष्णा जीनगर, प्रणव इंगळे, प्रेम मोरे, विजय मोरे आणि संतोष मोरे यांच्यात हाणामारी सुरू असल्याचे त्यांनी पाहिले.
वाद मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असतानाच विजय मोरे आणि संतोष मोरे यांनी कमरेतून धारदार शस्त्र काढत गौरवच्या छाती आणि पोटावर सलग वार केले. तब्बल आठ वार झाल्याने गौरव घटनास्थळीच कोसळला. तत्काळ उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबळे व पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला.
गौरव हा जिजामाता महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होता. प्राथमिक तपासात हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी ते ‘गुलदस्त्यात’ ठेवल्याचे कळते.
घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात मुख्य आरोपी विजय मोरेला अटक करण्यात आली. तसेच एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज कांबळे, पीएसआय गणेश कायंदे, अरुण मुंडे व त्यांच्या पथकाने केली.
या निर्घृण घटनेमुळे कारंजा रमजानपूर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.


