संभाजीनगर प्रतिनिधी
राज्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीत आतूनच तणाव वाढल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठी गळती बसली आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी अखेर पक्षाचा निरोप घेत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या सोबत काही महिला कार्यकर्त्यांसह पुरुष पदाधिकाऱ्यांनीही कमळ चिन्ह हातात घेत भाजपमध्ये प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून वाडकर यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन काही भाजप नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्याचदरम्यान शिंदेसेनेतील अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत वारंवार मिळत होते.
शिल्पा वाडकर यांच्या जाण्याने शिंदे गटाला संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा देत संघटन बळकटीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे. वाडकर यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना ही राजकीय हालचाल महत्वाची मानली जात असून, आगामी महापालिकेची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.


