मुंबई प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. 18 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झालेल्या आदेशानुसार पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे.
राज्य शासनात महत्त्वाची जबाबदारी निभावलेल्या राहुल रंजन माहीवाल (IAS 2005) यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे ही धुरा सोपवण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील ही भूमिका महत्त्वाची मानली जाते.
प्रकाश खापले (IAS 2013) यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका लक्षणीय ठरणार आहे.
डॉ. मंजीरी मनोळकर (IAS 2016) यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे म्हणून नियुक्त केले आहे. आदिवासी विकासाच्या दिशेने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जाते.
या बदल्यांमधील लक्षवेधी नियुक्ती म्हणजे त्रिगुण कुलकर्णी (IAS 2016) यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC–HSC Board), पुणे म्हणून झालेली बदली. यापूर्वी ते यशदा, पुणे येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. दहावी–बारावी परीक्षांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर येणार आहेत.
तसेच अंजली रमेश (IAS 2020) यांची आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदल्या प्रशासनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरत असून, संबंधित विभागांमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


