पुणे प्रतिनिधी
नवले पुलावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे शहर प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. कंटेनरवरील नियंत्रण सुटून झालेल्या या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले. वारंवार अपघात होत असलेल्या या परिसरात तातडीने सुरक्षाविषयक पावलं उचलण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला.
नवले पुलावर तीव्र उतार, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि सततचा वेग यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर अपघात घडले आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर एनएचएआय, पीएमआरडीए, वाहतूक विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तातडीच्या, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
अल्पकालीन उपाय तत्काळ राबवणार
• राष्ट्रीय महामार्गावर ५ मिमी, १० मिमी आणि १५ मिमीचे रम्बल स्ट्रिप्स बसविण्याचे काम महापालिकेकडून त्वरित हाती.
• महामार्गावर ठिकठिकाणी सूचना देणारे एलईडी बोर्ड बसविणे.
• अवजड वाहनांसाठी सक्तीने मुख्य रस्त्याची बाजू वापरण्याचे नियमन; सर्व्हिस रस्ते या वाहनांसाठी बंद.
• नो पार्किंग नियमांचे काटेकोर पालन; उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई.
• कात्रज–नवले पूल दरम्यान वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा अनिवार्य.
• वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई.
• अवैध वाहतूक आणि रस्त्यावर थांबणाऱ्या प्रवासी वाहनांवर कठोर निर्बंध.
सहा महिन्यांत चार सेवा रस्ते तयार
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुढील सहा महिन्यांत खालील सेवा रस्त्यांची उभारणी पूर्ण होणार आहे.
• सूस खिंड ते राधा हॉटेल
• डुक्कर खिंड ते मुठा नदी
• वडगाव पूल ते नवले पूल
• नवले पूल ते भुमकर पूल
नवले पुलाच्या सुरक्षेसाठी आतापर्यंतच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचे अनुभवावरून दिसून आले आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनाने अधिक समन्वित आणि आक्रमक पावले उचलण्याची भूमिका घेतली आहे.
आता या निर्णयांची अंमलबजावणी कितपत परिणामकारक ठरते आणि अपघातांची मालिका कायमस्वरूपी थांबते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


